सिंधुताई सकपाळ
अनाथांच्या माई असलेल्या ज्येष्ठ समाजसेविका माननीय सिंधुताई सकपाळ यांना “पद्मश्री” पुरस्कार जाहीर झालेला वाचून खूप आनंद झाला.
साधारण १८-१९ वर्षांपूर्वी सिंधुताईंच्या कार्यासंबंधीची माहिती माझ्या आईने मला सांगितली होती. मी त्यांना फोन करून त्यांना भेटण्यासाठी पुण्याला गेले होते. तेंव्हा फक्त ४ थी इयत्ता शिकलेल्या सिंधुताईंचे वक्तृत्व आणि कर्तृत्व बघून मी आश्चर्यचकित झाले आणि मी लगेच त्यांची मुलाखत घेतली. धर्मभास्करच्या संपादकांनी ती मुलाखत लगेच ऑक्टोबर २००२ च्या धर्मभास्कर अंकात छापली. त्याला वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
मातृसंस्कार मंडळ व सरस्वतीदेवी विद्या विकास ट्रस्टच्या वतीने मातृदिनी त्यांचा जाहीर सत्कार केला. या कार्यक्रमाला माजी कुलगुरू मा.डॉ.स्नेहलताताई देशमुख व सुप्रसिद्ध गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यावेळी ट्रस्टच्या हितचिंतकांनी संपूर्ण हॉल भरला होता. सिंधुताईंची कहाणी त्यांच्याच तोंडून ऐकताना सर्व श्रोते गहिवरले होते. त्यांच्या कार्यामुळे अनेक लोक संस्थेशी जोडले गेले.
नंतर ट्रस्ट द्वारा मदत देण्याच्या निमित्ताने मी त्यांना तीन चार वेळेस भेटले. तेंव्हा त्या मला म्हणाल्या होत्या की “पोरी, माझी वेदना घेऊन तू काम करत आहेस, माझे खूप आशीर्वाद तुला आहेत.” त्यांचे हे आशीर्वादाचे बोल मला आमच्या ट्रस्टचे काम करताना आजही ऊर्जा देतात.
‘धर्मभास्कर’ मासिकातील त्यांची अत्यंत प्रेरणादायी मुलाखत पुढे देत आहे. वाचकांनी वाचून अभिप्राय कळवावा ही विनंती.